
अँजेलिना जोलीने टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर मॅस्टेक्टॉमीचे व्रण दाखवले, समान उपचारांवर दिला भर
हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने टाइम मासिकाच्या फ्रेंच आवृत्तीच्या मुखपृष्ठावर मॅस्टेक्टॉमीचे (स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया) व्रण दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातून तिने सर्व महिलांसाठी वैद्यकीय उपचारांची समान उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर दिला आहे.
एका मुलाखतीत जोलीने सांगितले की, "तपासणी आणि उपचारांची उपलब्धता व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर किंवा राहण्याच्या ठिकाणावर अवलंबून नसावी." ती पुढे म्हणाली, "मी माझ्या अनेक प्रिय महिलांसोबत हे व्रण शेअर करते. जेव्हा मी इतर स्त्रियांना त्यांचे व्रण शेअर करताना पाहते, तेव्हा मला खूप प्रेरणा मिळते."
'मालेफिसेंट', 'इटर्नल्स' आणि 'विदाऊट ब्लड' यांसारख्या चित्रपटांतील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीने २०१३ मध्ये अनुवांशिक कारणांमुळे दोन्ही स्तने काढून टाकण्याची प्रतिबंधात्मक शस्त्रक्रिया केली होती आणि २०१५ मध्ये दोन्ही अंडाशय काढून टाकले होते. तिच्या या अनुभवाने अनेक महिलांना स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्यास प्रेरणा मिळाली आहे.
सध्या जोली फ्रेंच दिग्दर्शिका एलिस विनोकूर यांच्या 'कुटूर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट महिलांच्या कर्करोगाशी लढण्याच्या संघर्षावर आधारित आहे आणि पुढील वर्षी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी फ्रान्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
अँजेलिना जोलीच्या या धाडसी भूमिकेचे भारतीय चाहते कौतुक करत आहेत. "ही एक शक्तिशाली स्त्री आहे! तिचे धैर्य प्रेरणादायी आहे", असे चाहते सोशल मीडियावर लिहित आहेत. अनेकांनी सांगितले की, तिच्या या कृतीमुळे महिलांच्या आरोग्य समस्यांबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होईल.